गेवराई( प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील छत्रपती मल्टीस्टेट, श्री मंगलनाथ निधी, ज्ञानराधा मल्टीस्टेट, पतसंस्था आदी ठिकाणी ग्राहकाने ठेवी गुंतवणूक करण्यात आलेल्या आहेत. गुंतवणूकदाराकडून पैशाची मागणी वारंवार होत आहे. सर्वसामान्य, गरीब ग्राहकाने मोठ्या प्रमाणात कष्ट करून गुंतवणूक केली आहे.
गुंतवणूक दाराची रक्कम परत मिळत नसल्यामुळे ठेवीदारांमध्ये शासनाबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ठेवीदार मानसिक तणावात जीवन जगत आहेत. रक्कम परत मिळण्यास विलंब होत असल्यामुळे ग्राहकाचा संयम सुटत चाललेला आहे व ठेवीदार आत्महत्या करीत आहेत असे निदर्शनास आले आहे .ही बाब गंभीर आहे. याप्रकरणी जातीने लक्ष देऊन ठेवीदारांना तात्काळ न्याय देण्यात यावा. गुंतवणूकदार शासन निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाकडून याबाबत ठोस कारवाई झालेली नाही असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाला आहे.
या प्रकरणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने वारंवार आपणाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. परंतु अद्याप पर्यंत ठेवीदाराची रक्कम प्राप्त झाली नाही. या प्रकरणी ठेवीदारांचा संयम सुटत चालला आहे .तरी या प्रकरणी युद्ध पातळीवर ठेवीदाराची रक्कम प्राप्त होण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात यावेत. अशी विनंती करण्यात आली आहे.
तरी या प्रकरणी ग्राहकांना तात्काळ न्याय देण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.







