ग्राहक पंचायतीचे अनिल बोर्डे यांची पत्राद्वारे मा. पंतप्रधान यांच्याकडे मागणी.
गेवराई ( प्रतिनिधी) सन 1974 मध्ये मराठवाडा विकास आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले कार्यकर्ते व विविध संस्थेचे पदाधिकारी तथा ग्राहक पंचायत चे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी “मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे” व बीडला रेल्वे आली पाहिजे” हे मुख्य ब्रीद वाक्य होते. परंतु अद्याप पर्यंत परळी व बीड ला नियमितपणे रेल्वे सुरू झालेली नाही. तसेच बीडचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालेला नाही. इतर जिल्ह्याच्या मानाने आपण विकासापासून वंचित आहोत. तरी जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मा. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच मल्टीस्टेट व मल्टिपल निधी इतर गुंतवणूकदाराची रक्कम प्राप्त होण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे विनंती केलेली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची रक्कम विविध मल्टीस्टेट, मल्टिपल निधी, छत्रपती मल्टीस्टेट, ज्ञानराधा, श्री मंगलनाथ मल्टिपल निधी मध्ये ग्राहकाने गुंतवणूक केलेली आहे. रक्कम प्राप्त होत नसल्यामुळे एका ग्राहकाने आत्महत्या देखील केलेली आहे. इतर ग्राहकांना रक्कम प्राप्त होत नसल्यामुळे तणावाखाली जीवन जगत आहेत. तरी या प्रकरणी कामगार ,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार ,महिला ,मजूर, शेतकरी ग्राहक यांची रक्कम प्राप्त होण्यासाठी जातीने लक्ष पुरवून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर ते परळी या रेल्वे प्रकल्पास मंजूर करून गती देण्याचे कार्य आपणाकडून करण्यात आले आहे .उर्वरित काम युद्ध पातळीवर करण्यात यावे. तसेच धाराशिव ते संभाजीनगर रेल्वे मार्ग युद्ध पातळीवर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण जातीने लक्ष पुरवुन या प्रकल्पास गती देण्यात यावी. त्याशिवाय बीड जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार नाही.
बीड जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी व या भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी कोकणातून वाहुन जाणारे बीड जिल्ह्यात आणणे अत्यंत आवश्यक आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी मुळे आत्महत्या करीत आहे. जिल्ह्याला शेती शिवाय पर्याय नाही.
जिल्ह्यात विविध शैक्षणिक, तांत्रिक, वैद्यकीय प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे. बीड जिल्हा व गेवराई तालुका मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या भागामध्ये पैठणचे पाणी उपलब्ध होऊ शकते. तरी या भागात या मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे व प्रकल्प आणणे व बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देणे आवश्यक आहे .आधुनिक प्रकल्प उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याला बारामती प्रमाणे करण्यात येईल असे आश्वासन मा.कै.अजित दादा पवार यांनी दिले होते .परंतु अचानक पडद्याआड जाण्याने त्यांची कार्य अधूरे राहिले आहे .तरी ते पूर्ण करण्यासाठी आपण बीड जिल्हा दत्तक घेऊन उर्वरित विकासाचे कार्य पूर्ण केल्यास दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असे नमूद करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील ठेवीदाराची रक्कम युद्ध पातळीवर कारवाईचे निर्देश देण्यात यावेत तसेच बीड जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात सामील करून सहकार्य करावे अशी विनंती पत्रा द्वारे करण्यात आली आहे. तरी वरील पत्रावर सहानुभूतीपूर्वक युद्ध पातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी ई-मेल पत्राद्वारे द्वारे केलेली आहे.






