*मारफळा ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशन निधी अपहाराचा आरोप; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा*

गेवराई तालुक्यातील मौजे मारफळा ग्रामपंचायत अंतर्गत राठोड तांडा येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या अपहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम करून ग्रामपंचायत व संबंधित समितीने अंतर्गत नळयोजना अपूर्ण ठेवत निधी उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या परिसरात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राठोड तांड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. यापूर्वीही राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत सुमारे २९ लाख रुपये मंजूर झाले होते. त्या योजनेतही अर्धवट काम करून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

या संदर्भात २०१५ साली ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मनोज राठोड यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून संबंधित योजनेची अंमलबजावणी सुरळीत करण्यात यावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण तसेच रोड क्रमांक २२२ (कांबी फाटा) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”

या मागण्यांसाठी दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद बीड) तसेच गटविकास अधिकारी (पंचायत समिती गेवराई) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon