वाळूसाठी 20 हजाराची लाच स्वीकारताना दोघे ACB च्या जाळ्यात!

माजलगाव प्रतिनिधी : माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी इसम यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच वाळू वाहतुकीसाठी हप्त्यांची मागणी सुरू झाल्याचे समोर आले आहे. वाळूची वाहने सुरळीत चालू ठेवायची असतील तर दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे केली होती. ही लाच खाजगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्या माध्यमातून स्वीकारली जाणार होती.

 

या तक्रारीच्या आधारे जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून बुधवार, दि. २८ रोजी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर दोघांनाही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या कारवाईमुळे पोलीस प्रशासनातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सदर लाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मागितली होती का? यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच वरिष्ठांवर काय कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी तडकाफडकी प्रभारी अधिकारी असलेल्या राहुल सुर्यतळ यांची नियंत्रण कक्षात बदली करून त्या ठिकाणी होम डिवायएसपी असलेल्या उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव ठाण्याची सूत्रे सोपावली आहेत.तर नियंत्रण कक्षातून गात यांची बदली करत त्यांच्याकडे आता होम डीवायएसीपीचा पदभार देण्यात आला आहे.

    

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon