खरीप हंगाम 2026 साठी बियाण्यांवर अनुदान; शेतकऱ्यांनी ‘महा DBT’ वर तात्काळ अर्ज करावा – अनिल बोर्डे

गेवराई (प्रतिनिधी):खरीप हंगाम 2026 साठी शासकीय योजनां अंतर्गत सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ग्राहकांनी ‘महा DBT’ पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केले आहे.

येत्या खरीप हंगामासाठी शासनाच्या विविध योजनांमधून प्रमाणित बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून, या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, मुग आणि उडीद या पिकांच्या बियाण्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना अनुदानित दरात ही बियाणे उपलब्ध होणार आहेत.

 

या योजनेअंतर्गत 10 वर्षांच्या आतील तसेच 10 वर्षांवरील अधिसूचित वाणांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तेलबिया (गळीत धान्य) अभियानांतर्गत 5 वर्षांच्या आतील वाणांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया “आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर राबविण्यात येणार असल्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अर्ज प्रक्रिया ‘महा DBT’ प्रणालीद्वारे पार पडणार असून, वैयक्तिक शेतकऱ्यांनी ‘ॲग्री स्टॅक फार्मर आयडी’द्वारे नोंदणी करावी. तसेच शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी अधिकृत सदस्याच्या आयडीद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया 15 मे 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

दरम्यान, या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल बोर्डे यांनी केले असून, वेळेत अर्ज करून शासकीय सवलतींचा फायदा घेण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon