माजलगाव (प्रतिनिधी)* – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा प्रभारी अॕड. अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर ‘अर्धनग्न हलगी बजावो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माजलगाव तालुक्यातील सुमारे १५ ते ३० गावांमध्ये राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहेत. मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा प्रभारी अॕड.अमोल डोंगरे यांनी केला आहे. अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात कामे न करता कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ डोंगरे यांनी माजलगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना उपविभाग कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत हलगी वाजवत आंदोलन केले. “बोगस कामांची चौकशी करा, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा” अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त केली जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील विविध गावांमधून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.यावेळी आंदोलनात रमेश साळवे,हेमंत गोरे,संदिपान जाधव,ग्यानबा मस्के,सिरसट उपस्थित होते.







