आपल्या भारत देशासह संपूर्ण विश्वात विश्वरत्न, महामानव व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जयंतीदिनी सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, कार्य व विचारांचा जागर केला जातो. शहर, वस्ती, गावागावात समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांना विनम्र अभिवादन केले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देश व समस्त मानवतेच्या कल्याणासाठी समाज परिवर्तनाची क्रांती केली व देशाला सर्वोत्तम असे लिखित संविधान दिले. ज्ञानाचा महासागर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे परिवर्तनवादी विचार देशाच्या विकासासाठी आजही दिशादर्शक आहेत.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशास जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश बनवले. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश देत शिक्षणाने माणूस ज्ञानी व सुसंस्कृत बनतो, त्यास स्वाभिमान व आत्मविश्वास प्राप्त होतो हा विचार दिला. महाड येथे चवदार तळे सत्याग्रह करत अस्पृश्यता निर्मूलन व दलितांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला. अन्यायकारक विचारांनी प्रेरित मनुस्मृतीचे दहन करत हिंदू कोड बिल निर्माण केले व त्याद्वारे सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना न्याय, हक्क व अधिकार प्राप्त करून दिले. स्त्रीला वारसाहक्क, घटस्फोट, पुनर्विवाह व समतेचा अधिकार मिळवून दिला. यामुळे अंधश्रद्धा व समाजातील अनिष्ठ रूढी व परंपरांना आळा बसला.
नाशिक येथे काळाराम मंदिर आंदोलन उभारले, मुठभर लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणली व दलितांना मंदिर प्रवेश मिळवून दिला. पुणे करारान्वये दलितांना राखीव मतदारसंघ मिळाला. शेतकऱ्यांसाठी वीजनिर्मिती, जलसिंचन, नदीप्रकल्प आदीं आवश्यक गोष्टी मिळवून दिल्या. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत अग्रस्थानी राहिले. बहुजनांच्या उद्धारासाठी विपुल लेखन केले. शासकीय कर्मचाऱ्यास योग्य प्रमाणात वेतन, रजा व सार्वजनिक सुट्ट्यांचे प्रयोजन केले.
कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १२ तासांऐवजी ऐवजी ०८ तास केले. सर्वसामान्य जनतेस शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींना शाळेची वाट दाखवली. शाळा, वसतिगृहे व शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली. शेतकरी, दलित, शोषित, वंचित, आदिवासी आदींना आपल्या न्याय, हक्क व अधिकारांची जाणीव करून दिली. जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी अविरत प्रयत्न केले. गोरगरीब जनतेचा आवाज बनले. मानवी प्रतिष्ठेस महत्त्व दिले. समाजात लोकशाहीची तत्वे रुजवली. धर्म व जातिभेदाविरूद्ध संघर्ष केला. खरे पाहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून अतिशय उदात्त हेतूने भारताचे संविधान निर्माण केले आहे.
आपण भारतीय संविधानाप्रती आदर ठेवला पाहिजे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होते. जनतेच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे व त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच त्यांना जयंतीदिनी खरी आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

प्रा. (डॉ.) अंबादास सकट किसन वीर महाविद्यालय, वाई







