शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना दक्षता घ्यावी :- अनिल बोर्डे

गेवराई : खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत असून शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे. शेतकरी ग्राहकांच्या हितासाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकातून त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

खरीप हंगाम हा शेतकरी ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात शेतकऱ्यांची बियाणे व खत खरेदीची लगबग सुरू असते. मात्र अनेक वेळा घाईगडबडीत योग्य तपासणी न करता खरेदी केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी ग्राहकांनी खरेदीपूर्वी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे अनिल बोर्डे यांनी स्पष्ट केले.

महाडीबीटी प्रणालीअंतर्गत कृषी विभागाकडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून १५ मे २०२६ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी नेहमी परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत, तसेच खरेदीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार आवश्यक तेवढ्याच खतांची खरेदी करावी. त्यामुळे पैशांची बचत होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

खते व बियाण्यांच्या गोण्यांवरील बॅच नंबर, उत्पादन तारीख, एमआरपी आणि इतर माहिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत कमी दरात खते किंवा बियाणे देण्याचे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. छापील किमतीपेक्षा अधिक दराने खरेदी करू नये आणि प्रत्येक खरेदीवेळी पक्के बिल घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात तक्रार निवारणासाठी अधिकृत पावती महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधार कार्डशिवाय खत खरेदी करता येणार नसून अनुदानित खतासाठी आधार लिंक असणे आणि पीओएस मशीनवर बायोमेट्रिक पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच फार्मर आयडीशी लिंक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रानुसारच खतांचे वाटप व विक्री केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यास अथवा शेतकरी ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधित कृषी केंद्र किंवा कृषी विभागाच्या तक्रार निवारण केंद्राशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही अनिल बोर्डे यांनी केले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon