१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे-परळी रेल्वे सुरू करा; खासदार बजरंग सोनवणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश.

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे-परळी रेल्वे सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे विभाग, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे धावणार: ३१ मे पर्यंत ट्रॅक पूर्ण, जूनमध्ये चाचणी

रेल्वे विभागाच्या आढाव्यादरम्यान खासदारांनी कामाच्या संथ गतीबद्दल चर्चा करत नवीन डेडलाईन निश्चित केली.

परळीपर्यंत ट्रॅक: ३१ मे २०२६ पर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

रेल्वे चाचणी: जून महिन्यात या मार्गावर रेल्वेची अधिकृत चाचणी घेतली जाणार आहे.

नवीन मागण्या: बीड-नगर-मुंबई आणि बीड-नगर-पुणे अशा इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली.

पायाभूत सुविधा: आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड तालुक्यात ‘रोड ओव्हर ब्रिज’ उभारणे, बार्शी नाका येथे अतिरिक्त थांबा, रेल्वे स्थानकांवर पार्किंग आणि सोलर प्रकल्प उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रस्ते विकास आणि ‘ब्लॅकस्पॉट’वर प्रहार

जिल्ह्यातील रस्ते आणि अपघातांचे वाढते प्रमाण पाहता खासदार सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

बायपास आणि उड्डाणपूल: अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास आणि उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले.

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण चौकात तातडीने फूटओव्हर ब्रिज उभारण्याच्या सूचना दिल्या.

रस्ते दुपदरीकरण: पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा-पाटोदा-चुंबळी फाटा या मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे निर्देश दिले.

अपघात निवारण: जिल्ह्यातील सर्व ‘ब्लॅकस्पॉट’ (अपघातप्रवण क्षेत्रे) तातडीने दुरुस्त करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगितले.

खराब रस्त्यांबाबत तीव्र नाराजी

बैठकीत काही विशिष्ट मार्गांच्या दुरवस्थेबाबत खासदारांनी संताप व्यक्त केला:

पालखी मार्ग: पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव दरम्यानच्या अत्यंत खराब रस्त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दुरुस्तीचे आदेश: माजलगाव-धारूर-केज आणि खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी-गढी-माजलगाव या मार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.

धाराशिव-बीड-संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गाचा आढावा

नवीन प्रस्तावित धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि केंद्र शासनाकडे आवश्यक प्रस्ताव त्वरित पाठवावेत, असे निर्देश रेल्वे विभागाला देण्यात आले. तसेच घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर विविध गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

“जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे आणि रस्ते हे कणे आहेत. यामध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. १५ ऑगस्ट २०२६ हे आमचे लक्ष्य आहे.”

— खा. बजरंग सोनवणे

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon