बीड:
“स्वच्छ बीड, सुंदर बीड” – ही केवळ भिंतीवरची जाहिरात आणि नेत्यांच्या भाषणातील शब्दांची फुलोरा ठरत आहे की काय, असा संतप्त सवाल आता सामान्य बीडकर विचारू लागला आहे. शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष यामुळे बीडकरांचे आरोग्य अक्षरशः टांगणीला लागले आहे.
गप्पा विकासाच्या, दर्शन कचऱ्याचे!
नगरपालिका आपल्या ताब्यात असल्याचा अभिमान बाळगणारे आमदार विजयसिंह पंडित मोठ्या दिमाखात कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा मारतात. विकासाचा ध्यास घेतल्याचे दावे केले जातात, परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर फिरताना “विकासाचे” जे दर्शन घडतेय, ते अत्यंत विदारक आहे. शहरात मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळांपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, त्यात अन्नाचा शोध घेणारी जनावरे आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.
आरोग्य धोक्यात; प्रशासन झोपेत!
सध्या पावसाळी वातावरण आणि अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर बळावला आहे. एकीकडे आरोग्य विभाग नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करतो, तर दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाचा स्वच्छता विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.
“काय बीडकरांना मोठे आजार जडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
घोषणा नको, कृती हवी!
फक्त निधी आणला म्हणून विकास होत नाही, तो जमिनीवर दिसणे अपेक्षित आहे. केवळ सोशल मीडिया आणि फलकांवर “सुंदर बीड” दिसण्यापेक्षा ते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसायला हवे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर “ताबा” आणि “सत्ता” या शब्दांचा खरा अर्थ जनता येत्या काळात मतपेटीतून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
ठळक मुद्दे:
निधीच्या घोषणा हवेत: प्रत्यक्षात शहरात कचऱ्याचे ढीग कायम.
जनावरांचा वावर: कचरा कुंडीत जनावरांचा सुळसुळाट, अपघातांना निमंत्रण.
साथीच्या रोगांची भीती: डेंग्यू-मलेरियाच्या विळख्यात बीडकर अडकण्याची शक्यता.
जनतेचा इशारा: प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलनाचा पवित्रा.
आता तरी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन बीडकरांना मोकळा श्वास घेऊ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







