बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांचे आवाहन
गेवराई (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील ज्या शेतकरी ग्राहकांनी अद्याप आपला ‘युनिक फार्मर आयडी’ (Farmer ID) काढलेला नाही, त्यांनी २० मे २०२६ पर्यंत ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. हा आयडी असल्याशिवाय बी-बियाणे, खते, पीक विमा, अनुदान आणि कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा इशारा बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.शासनाने शेतकरी ग्राहकांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ अनिवार्य करण्याची योजना १४ नोव्हेंबर २०२४ पासूनच लागू केली आहे. याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायतीमार्फत वेळोवेळी प्रसिद्धी पत्रके काढून शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले होते. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.कृषी विभागातील माहिती आणि व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकाकडे हा ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. १५ एप्रिल २०२५ पासूनच कृषी विभागाने शासकीय लाभ घेण्यासाठी हा आयडी बंधनकारक केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा युनिक आयडी नसेल, त्यांना खालील लाभांपासून वंचित राहावे लागू शकते:शासकीय अनुदान आणि पीक विमा.बी-बियाणे आणि खतांची खरेदी.कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी.पीक पद्धतीशी संबंधित शासकीय लाभ.जिल्ह्यातील उर्वरित सर्व शेतकरी ग्राहकांनी २० मे २०२६ या अंतिम मुदतीपूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. हा आयडी काढताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही अनिल बोर्डे यांनी स्पष्ट केले आहे. विना विलंब ओळखपत्र काढणे ही शेतकऱ्यांच्या हिताची बाब असून, त्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे.







