बीड शहरात सध्या बार्शी नाका ते राष्ट्रवादी भवन या मार्गावर दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालक आणि पादचारी यांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने प्रवास करणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की ती तोंड आणि नाकाद्वारे धूळ शरीरात जात असल्याने अनेक नागरिक आजारी पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. धुळीमुळे खोकला, घशात जळजळ, श्वास घेण्यास त्रास तसेच डोळ्यांची जळजळ अशा समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी धुळीचे प्रमाण आणखी वाढत असल्याने दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
या भागातील नागरिकांची मागणी आहे की रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच काम सुरू असताना धूळ कमी होण्यासाठी रस्त्यावर नियमित पाणी मारावे आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था करावी, अशीही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







